वझर आघाव परिसरात बिबट्याची दहशत; वासराची शिकार, शेतकऱ्यांना बिबट्या नजरेस
रघुनाथ आघाव, लोणार तालुका प्रतिनिधी
लोणार:- तालुक्यातील वझर आघाव परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून वासराची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वझर आघाव परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतात गहू काढण्याचे काम मशीनद्वारे सुरू होते. याच दरम्यान शेतात एक वासरू मृत अवस्थेत आढळून आले. वासरू मारलेले असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी परिसरात पाहणी केली. त्यावेळी जवळच दबा धरून बसलेला बिबट्या त्यांच्या नजरेस पडला.बिबट्या दिसताच शेतकऱ्यांनी तत्काळ आरडाओरड केली. आवाज होताच बिबट्याने तेथून पळ काढत जवळील मक्याच्या शेतात जाऊन लपल्याची माहिती मिळाली. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वर्णनावरून परिसरात मादी बिबट व तिचे पिल्लू असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, रात्री उशिरा वन विभागाची टीम गावात दाखल झाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आवश्यक मार्गदर्शन केले. आपल्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी आणि बिबट्या दिसल्यास त्वरित वन विभागाला कळवावे, असेही नागरिकांना सांगण्यात आले.या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे.
