सामाजिक कार्यकर्ते रमेशआण्णा मुळे यांच्यावर विनयभंगाचा आरोप; अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
रघुनाथ आघाव लोणार तालुका प्रतिनिधी
लोणार : लोणार तालुक्यातील उदनापूर येथे किरकोळ वादातून एका वृद्ध महिलेवर अमानवीय अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. जमिनीच्या वादात मध्यस्थी करण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले रमेशआण्णा मुळे यांनी मातंग समाजातील ६० वर्षीय महिलेला भररस्त्यात मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली आणि तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी लोणार पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उदनापूर येथील भिकाबाई लक्ष्मण नेमाडे (वय ६०) या मातंग समाजातील रहिवासी असून गावात सामाजिकदृष्ट्या सक्रिय म्हणून ओळखल्या जातात. आरोपी रमेश अर्जुन मुळे आणि त्यांचा पुतण्या संजय मुळे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संपत्तीवरून वाद सुरू होता. या वादात समझोता घडवून आणण्यासाठी आरोपीने भिकाबाई नेमाडे यांना मध्यस्थी करण्यास सांगितले होते. मात्र दोन्ही बाजूंमध्ये एकमत होऊ न शकल्याने समझोता होऊ शकला नाही. याचाच राग मनात धरून आरोपीने महिलेला लक्ष्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.घटनेच्या दिवशी म्हणजे १२ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास भिकाबाई नेमाडे या गावातील पिठाच्या गिरणीतून दळण आणण्यासाठी गेल्या होत्या. गिरणी बंद असल्याने त्या परत आपल्या घरी येत असताना आरोपी रमेशआण्णा मुळे यांनी त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर मागून येऊन त्यांच्या कमरेत जोरात लाथ मारली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्या जमिनीवर कोसळल्या.महिला खाली पडल्यावरही आरोपीने त्यांना सोडले नाही. उलट त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत बेदम मारहाण केली. यावेळी आरोपीने “मांगटे, मांगीन, कुत्रे” अशा अत्यंत अपमानास्पद जातीवाचक शब्दांत शिवीगाळ करत पीडितेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेने आरडाओरड करत मदतीसाठी हाक मारल्यानंतरही आरोपीने अश्लील आणि लज्जास्पद भाषा वापरत तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे.या झटापटीदरम्यान पीडितेच्या अंगावरील ब्लाउजची बाही फाटल्याची माहितीही समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपीने पीडित महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेनंतर भिकाबाई लक्ष्मण नेमाडे यांनी लोणार पोलीस ठाण्यात जाऊन सविस्तर तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रमेश अर्जुन मुळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ७४, २९६, ११५ (२), ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(१)(यु), ३(१)(डब्ल्यू)(आय), ३(१)(डब्ल्यू)(आयआय) आणि ३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या घटनेची माहिती गावात पसरताच उदनापूर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. एका वृद्ध महिलेसोबत अशा प्रकारचे गैरवर्तन झाल्याने सामाजिक संघटना आणि मागासवर्गीय समाजबांधवांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास मेहकर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून लोणार पोलीस अधिक तपास करीत आहेत..
