गावागावात निवडणुकीचा धुरळा! बुलढाणा जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर.
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ):राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील रिक्त असलेल्या थेट सरपंच आणि सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील ५९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या घोषणेसोबतच १७ मार्चच्या मध्यरात्रीपासून संबंधित निवडणूक क्षेत्रांत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील ५९ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. ३० मार्च रोजी निवडणुकीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.असे आहे निवडणूक वेळापत्रक:निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे जिल्हा प्रशासनाने पुढीलप्रमाणे निश्चित केले आहेत:नामनिर्देशन पत्र (अर्ज) दाखल करणे: ७ एप्रिल ते १३ एप्रिल २०२६ (सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत).अर्जांची छाननी: १५ एप्रिल २०२६ (सकाळी ११ वाजेपासून).अर्ज मागे घेण्याची मुदत: १७ एप्रिल २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत).मतदान: २८ एप्रिल २०२६ (सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३०).मतमोजणी व निकाल: २९ एप्रिल २०२६.आचारसंहितेचे कडक निर्बंधनिवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायत क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही घोषणा, नवीन कामांचे भूमिपूजन किंवा लोकार्पण मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना करता येणार नाही. आचारसंहितेचा भंग झाल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.प्रशासकीय स्तरावर निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायत स्तरावर सूचना फलकांवर ३० मार्च रोजी सविस्तर माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.
