रब्बी हंगाम २०२५-२६ सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीसाठी ३१/०३/२०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ.
चिखली (एकनाथ माळेकर)महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत संपूर्ण राज्यात ई-पीक पाहणी (Digital Crop Survey) अंतर्गत मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ साठी ही नोंदणी प्रक्रिया १० डिसेंबर २०२५ पासून सुरू करण्यात आली होती. प्रशासकीय आढाव्यानुसार, राज्यातील पीक नोंदणीचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण न झाल्याने, शासनाने या प्रक्रियेला आता ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. चिखली तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी अद्याप तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे प्रलंबित आहे, त्यांनी या वाढीव संधीचा लाभ घेऊन आपली नोंदणी तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार चिखली यांनी केले आहे.रब्बी हंगामासाठी १० डिसेंबर २०२५ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत शेतकरी स्तरावरून नोंदणी सुरू होती. त्यानंतर २५ जानेवारी २०२६ पासून सहाय्यक स्तरावरून नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली, ज्याची अंतिम मुदत १० मार्च २०२६ पर्यंत होती. सद्यस्थितीत चिखली तालुक्यात केवळ 84% क्षेत्राचीच नोंदणी पूर्ण झालेली आहे. पीक नोंदणी वेळेत पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना विविध शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागू शकते जसे कि, पिकांचे नुकसान झाल्यास मिळणारी शासकीय मदत किंवा सानुग्रह अनुदान, विमा दाव्यांची पूर्तता करण्यासाठी सातबारावरील पिकाची नोंद आधारभूत मानली जाते, बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या पीक कर्जासाठी पीक पाहणीची नोंद अनिवार्य आहे.तालुक्यातील पीक नोंदणी १००% पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही, त्यांनी तातडीने आपल्या गावातील संबंधित ग्राम महसूल अधिकारी किंवा ई-पिक पाहणी सहायक यांच्याशी संपर्क साधून ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ (DCS) अंतर्गत नोंदणी पूर्ण करून घ्यावी. असे आवाहन तहसीलदार श्री.विजय सवडे यांनी केले आहे.
