सामाजिक वनीकरण परीक्षेत्र सिंदखेड राजा अंतर्गत जागतिक चिमणी दिन, वन दिन व जल दिन साजरा
सिंदखेडराजा( अनिल दराडे )सामाजिक वनीकरण परीक्षेत्र सिंदखेड राजा अंतर्गत जागतिक चिमणी दिन, जागतिक वन दिन व जागतिक जल दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना जागतिक चिमणी दिन, वन दिन व जल दिन यांचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संवर्धन, चिमण्यांचे संरक्षण, वृक्षसंवर्धन तसेच जलसंधारण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे विशेष श्रेय कुमारी विद्या लक्ष्मण वाघ, वनरक्षक यांना जाते.या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये चिमण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जलपात्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व, झाडांचे जीवनातील स्थान तसेच पाणी बचतीची आवश्यकता याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजात पोहोचविण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे महत्त्व पटवून देऊन प्रभावी मार्गदर्शन करण्याचे कार्य श्रीमती विद्या वाघ, वनरक्षक यांनी केले.सदर उपक्रम सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात आला. यामध्ये श्री. विपुल राठोड, विभागीय वन अधिकारी, श्रीमती पूजा पानसरे, सहाय्यक वनसंरक्षक तसेच श्री. चक्रधर खेरडे, वनक्षेत्रपाल यांचे मार्गदर्शक सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधितांनी मोलाचे सहकार्य केले.
