वांग्याच्या शेतात अफूची शेती; स्थानिक गुन्हे शाखेचा बुलढाण्यात मोठा छापा!मेरा खुर्द शिवारात ९ लाखांचा मुद्देमाल जप्त; अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
बुलढाणा/अंढेरा(एकनाथ माळेकर):जिल्ह्यात अवैध अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे. चिखली तालुक्यातील मेरा खुर्द शिवारात वांग्याच्या पिकाच्या आड छुप्या पद्धतीने केलेली अफूची शेती उद्ध्वस्त करण्यात आली असून, पोलिसांनी सुमारे ९ लाख १८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.नेमकी घटना काय?स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये आणि त्यांचे पथक देउळगाव राजा विभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका गोपनीय बातमीदाराकडून विश्वासार्ह माहिती मिळाली. मेरा खुर्द येथील रहिवासी कृष्णा रामहरी वाघमारे (वय २६) याने आपल्या शेतात (गट नंबर २०३) बेकायदेशीररीत्या अफूची लागवड केल्याचे समजले.माहिती मिळताच पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेतली आणि NDPS कायद्यातील तरतुदींनुसार मेरा खुर्द शिवारात छापा टाकला.वांग्याच्या आड ‘काळे सोने’पोलिसांनी शेतात प्रवेश केला तेव्हा वरवर पाहता तिथे वांग्याची झाडे दिसत होती. मात्र, बारकाईने पाहणी केली असता वांग्याच्या झाडांच्या मध्ये अफूची पूर्ण परिपक्व झालेली हिरवट झाडे, पाने आणि बोंडे दिसून आली. पोलिसांनी पंचनामा करून ही सर्व झाडे मुळासकट उपटून जप्त केली.जप्त मुद्देमाल: ११.४७९ किलो ग्रॅम अफूची झाडे व बोंडे.एकूण किंमत: ९,१८,३२०/- रुपये.आरोपी: कृष्णा रामहरी वाघमारे (रा. मेरा खुर्द).गुन्हा: अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये कलम ८(क), १८(क) NDPS ॲक्टनुसार गुन्हा नोंद. कारवाई SDPO मनीषा कदम आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनी रुपेश शंकर शक्करगे हे करत आहेत. या कारवाईमुळे अवैध अमली पदार्थ विक्री आणि लागवड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
