झोटींगा येथे संत झोटूबा महाराज प्रगट दिनानिमित्त रामनवमी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद!कीर्तन, प्रवचन, दिंडी व पालखी सोहळ्याने परिसरात भक्तिमय वातावरण
सिंदखेडराजा (अनिल दराडे) सिंदखेडराजा तालुक्यातील तालुक्यातील झोटींगा येथे बालयोगी संत झोटूबा महाराज प्रगट दिनानिमित्त श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित भव्य यात्रा व कीर्तन महोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दि. २३ मार्चपासून सुरू झालेला हा धार्मिक सोहळा दि. २६ मार्चपर्यंत विविध भक्तिमय कार्यक्रमांनी रंगणार असून परिसरात सर्वत्र आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.उत्सवाच्या निमित्ताने दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ८ विष्णुसहस्रनाम, १० ते १२ गाथा भजन, दुपारी १ ते ४ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६.२० हरिपाठ, तसेच रात्री ८.३० ते १०.३० हरिकीर्तन व त्यानंतर हरिजागर असा नियमित कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमांमुळे गावासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.उत्सवादरम्यान विविध कीर्तनकार व प्रवचनकार आपली सेवा देत असून दि. २४ मार्च रोजी पंडरीनाथ विठोबा नागरे यांचे प्रवचन झाले. तसेच ज्ञानेश्वर रंगनाथ डिघोळे, जनार्धन भानुदास डिघोळे , डॉ. उमेश बापुराव वाघ , दिनकर कारभारी मुंढे व डॉ.शिवहरी भानुदास वाघ यांनी अन्नदानाच्या पंक्ती वाटप करून घेतलेल्या आहेत.याशिवाय प्रत्येक दिवशी ह.भ.प. अशोक महाराज इलग, भुषण महाराज तळणीकर (लातूर), माऊली महाराज पिंगळे (आळंदी) असे नामवंत महाराजांचे कीर्तन होणार आहे. तसेच शेवटच्या दिवशी ह. भ. प. अमोल महाराज घुगे (अकोला) यांचे रामजन्म व काल्याचे विशेष कीर्तन होईल.दि. २६ मार्च रोजी सकाळी ६ ते १० या वेळेत भव्य दिंडी व पालखी सोहळा गावामध्ये काढण्यात येणार असून, त्यानंतर काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या सोहळ्यासाठी परिसरातील संत, महंत व मान्यवरांची उपस्थिती लाभत असून, या भक्तिमय पर्वाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रगट दिन उत्सव समिती, मंदिर समिती व समस्त झोटिंगा ग्रामस्थांनी केले आहे.
