रस्ता खोदून ठेवला, पण काम मिळेना; सुंदरखेडमधील संतप्त नागरिकांचा प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम….
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ):तालुक्यातील सुंदरखेड येथील वॉर्ड क्रमांक २ मधील मागासवर्गीय वस्तीतील रस्त्याचे काम गेल्या महिनाभरापासून रखडल्याने नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. रस्ता खोदून ठेवल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, प्रशासनाच्या या दिरंगाईविरोधात ग्रामस्थांनी आता थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. ७ दिवसांत काम सुरू न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.सुंदरखेड परिसरातील ‘भाऊराव पवार यांचे दुकान ते राहुल कासारे’ यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. रस्ता तयार करण्यासाठी साधारण ३० दिवसांपूर्वी खोदकाम करण्यात आले. मात्र, खोदकाम करून कंत्राटदाराने काम अर्धवट सोडले आहे. उघड्या पडलेल्या रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून, पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना यामुळे दुखापत होण्याच्या घटना रोजच घडत आहेत.जातीय द्वेषातून कामाला खिळ?या प्रकरणात नागरिकांनी प्रशासनावर अतिशय गंभीर आरोप केला आहे. सदर रस्ता हा मागासवर्गीय वस्तीत येत असल्याने जातीय द्वेष भावनेतून जाणीवपूर्वक हे काम रखडवले जात आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराकडे वारंवार खेटे घालूनही केवळ ‘उद्या करू, परवा करू’ अशी टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात असल्याचा संताप रहिवाशांनी व्यक्त केला आहे.प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटमया अन्यायाविरोधात रहिवासी अतुल दाभाडे, विश्वास वानखेडे, अमोल दिवाणे व अन्य नागरिकांनी जिल्हा परिषद प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. जर येत्या ७ दिवसांत रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले नाही, तर ग्रामपंचायत कार्यालय सावळा-सुंदरखेड समोर ‘आमरण उपोषण’ छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद आहे.आता या तक्रारीनंतर जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे होऊन सुंदरखेडच्या नागरिकांना दिलासा देणार की आंदोलनाची वेळ येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
