महावितरणच्या ‘आडमुठेपणा’चा बिबट्याला फायदा; इसरूळमध्ये वासराची शिकार​तंटामुक्ती अध्यक्षांच्या शेतात बिबट्याचा थरार; वनविभागाकडून पंचनामा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Picsart_26-03-31_21-58-11-169


​इसरूळ (एकनाथ माळेकर):महावितरणच्या धरसोड वृत्तीमुळे ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी पसरणाऱ्या अंधाराचा फायदा आता हिंस्त्र श्वापदे घेऊ लागली आहेत. मौजे इसरूळ येथील तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकिसन लक्ष्मण काळे यांच्या शेतात काल रात्री बिबट्याने शिरकाव करून एका गाईच्या वासराची शिकार केली. या घटनेमुळे इसरूळसह परिसरात प्रचंड दहशत पसरली असून, महावितरणच्या कारभारावर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकिसन काळे यांच्या शेतात जनावरे बांधलेली असताना रात्रीच्या वेळी बिबट्याने याठिकाणी हल्ला केला. महावितरणकडून रात्रीचा वीजपुरवठा खंडित असल्याने सर्वत्र काळोख होता. याच अंधाराचा फायदा घेत बिबट्याने एका गाईवर आणि वासरावार हल्ला चढवला. या हल्ल्यात बिबट्याने गाईचे लहान वासरू ओढत नेले आणि त्याला पूर्णपणे फस्त केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली
घटनेची माहिती मिळताच सकाळी ८:०० वाजता वनविभागाचे अधिकारी श्री. पोटे साहेब यांनी घटनास्थळी धाव घेऊन रितसर पंचनामा केला. यावेळी इसरूळचे सरपंच सतीश पाटील भुतेकर, पोलीस पाटील जयपाल वायाळ, पत्रकार भिकनराव भुतेकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सरपंच सतीश पाटील भुतेकर यांनी वनरक्षक श्री. पोटे व मुंडे साहेब यांना बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना केली. “परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा आणि पीडित शेतकऱ्याला तातडीने शासकीय मदत मिळवून द्यावी,” अशी मागणी सरपंचांनी केली.
​महावितरणच्या भूमिकेकडे लक्ष
शेतकऱ्यांच्या मते, जर रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरळीत असता, तर दिव्यांच्या प्रकाशामुळे बिबट्याला शिकारीसाठी वाव मिळाला नसता. आता या घटनेनंतर तरी महावितरण इसरूळ परिसरात रात्रीची वीज सोडणार का? की आणखी मोठ्या अनर्थाची वाट पाहणार? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!