काळाचा घाला: मधमाशांच्या भीषण हल्ल्यात शेतकऱ्याचा अंत; मजुराचा विहिरीत तासाभर मृत्यूशी झुंज देऊन थरारक बचाव
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज): निसर्गाचा कोप कधी आणि कोणत्या रूपाने येईल याचा नेम राहिलेला नाही. बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड भट येथे मंगळवारी सकाळी काळाने मधमाशांच्या रूपाने घाला घातला. शेतात राबणाऱ्या ६५ वर्षीय शेतकऱ्याचा मधमाशांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला, तर एका मजुराने विहिरीत उडी घेऊन सुमारे तासभर मृत्यूशी झुंज दिली आणि स्वतःचे प्राण वाचवले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. सोहम ज्ञानदेव सुरोशे (वय ६५) हे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होते. त्यांच्यासोबत मजूर सचिन निकाळजे हे देखील कामात मग्न होते. शांत असलेल्या परिसरात अचानक मधमाशांच्या एका मोठ्या झुंडीने सुरोशे यांच्यावर भीषण हल्ला चढवला. काही समजण्याच्या आत शेकडो मधमाशांनी त्यांना घेरले.मजुराचा थरारक बचाव सुरोशे यांच्यावर हल्ला होत असतानाच माशांनी सचिन निकाळजे यांच्याकडे आपला मोर्चा वळवला. मात्र, समोर मृत्यू दिसत असताना सचिन यांनी प्रसंगावधान राखले आणि थेट जवळच असलेल्या विहिरीत उडी घेतली. मधमाशा विहिरीच्या काठावर घोंघावत होत्या, त्यामुळे सचिन यांनी तब्बल एक तास पाण्यात राहून आपला जीव वाचवला. माशांचा वावर कमी झाल्यानंतर ते बाहेर आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली शेकडो मधमाशांच्या दंशामुळे सोहम सुरोशे हे जागीच कोसळले होते. त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, शरीरात विष भिनल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सोहम सुरोशे यांच्या पश्चात मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने सुरोशे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.
