आरोग्यसंपन्न ग्रामीण महाराष्ट्रासाठी राज्य शासनाचे पाऊल; १ एप्रिलपासून ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानबुलढाणा जिल्ह्यासह राज्यात अंमलबजावणी; उत्कृष्ट कामासाठी कोट्यवधींची बक्षिसे…
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ):ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. येत्या १ एप्रिलपासून या अभियानाचा राज्यव्यापी प्रारंभ होत असून, लोकसहभागातून आरोग्याचा जागर करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्हा परिषद आणि आरोग्य प्रशासनाने या अभियानासाठी कंबर कसली आहे.राज्य मंत्रिमंडळाने १० फेब्रुवारी २०२६ रोजी या अभियानास मान्यता दिली असून, यासाठी ८०.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येत आहे.असे आहे बक्षिसांचे स्वरूपया अभियानात ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ हा किताब देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धात्मक स्वरूपात राबवल्या जाणाऱ्या या अभियानात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर मोठी पारितोषिके दिली जाणार आहेत:जिल्हा परिषद स्तर: प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी आणि तृतीय २ कोटी रुपये.पंचायत समिती स्तर: प्रथम २ कोटी, द्वितीय १.५ कोटी आणि तृतीय १.२५ कोटी रुपये.गावांसाठी: जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर २५ लाखांपासून ५ कोटी रुपयांपर्यंतची बक्षिसे.उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भरया अभियानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ आजारावर उपचार न करता, आजार होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. यामध्ये स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण, माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य आणि संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.चळवळीत सहभागी होण्याचे आवाहनदरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत हे अभियान राबविले जाईल. ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषद प्रशासन यांच्या समन्वयातून हे अभियान यशस्वी केले जाणार आहे.”हे अभियान केवळ सरकारी योजना नसून, ती एक सामाजिक आरोग्य चळवळ आहे. लोकसहभागातून ग्रामीण महाराष्ट्र अधिक सुदृढ आणि निरोगी करण्यासाठी सर्वांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा.”— डॉ. अमोल राम गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा.
