विझोरा व राहेरी खुर्द ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी…..
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) गट ग्रामपंचायत विज्ञझोरा/राहेरी खुर्द येथील २०१५ ते २०१९ या कालावधीत १३वा व १४वा वित्त आयोग तसेच विविध योजनांतर्गत झालेल्या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती सिंदखेड राजा यांना तक्रार अर्ज सादर केला आहे.सादर तक्रार अर्जात जनरल फंड, दलित वस्ती योजना, पाणीपुरवठा, पांदण रस्ता, रोजगार हमी योजना, सांडपाणी नाली व्यवस्था तसेच ई-क्लास जमिनीवरील रॉयल्टी आदी बाबींमध्ये झालेल्या खर्चाची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार व अफरातफर झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वरील सर्व कामांमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून अनियमितता झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, पुढील चार दिवसांत या खर्चाची सखोल चौकशी करून अहवाल जाहीर करावा. तसेच चौकशी अहवालाच्या प्रमाणित प्रती अर्जदारांना देण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.जर १६ एप्रिल २०२६ पर्यंत प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही झाली नाही, तर संबंधित अर्जदार व ग्रामस्थ १६ एप्रिलपासून उपोषण आंदोलन छेडणार असल्याचा इशारा तक्रार अर्जात देण्यात आला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.या तक्रार अर्जावर गणेश रमेश भानुसे, विलास सखाराम परसणे, सुनिल कारभारी झगरे, योगेश भास्कर भानुसे, गजानन श्रीराम भानुसे, अंकुश रामजी भानुसे आणि भास्कर गैबी भानुसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.या अर्जाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री Devendra Fadnavis, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी बुलडाणा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा तसेच तहसीलदार सिंदखेड राजा यांना माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.
