चिखली तहसील प्रशासनाचा ‘धडाका’; एकाच दिवसात तीन प्रलंबित शेतरस्ते मोकळेतहसीलदार विजय सवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; शेकडो शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा….
चिखली (एकनाथ माळेकर):ग्रामीण भागातील दळणवळणाच्या समस्यांवर चिखली तहसील प्रशासनाने निर्णायक प्रहार केला आहे. तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले तीन महत्त्वाचे शेतरस्ते एकाच दिवशी मोकळे करून प्रशासनाने ‘तिहेरी यश’ संपादन केले. तहसीलदार विजय सवडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या धडाकेबाज मोहिमेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

१. मौजा महीमळ: ६०-७० नागरिकांचा मार्ग सुकरमहीमळ येथे मागील अनेक वर्षांपासून ०.५ कि.मी. लांबीचा शेतरस्ता वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. नायब तहसीलदार वीर आणि ग्राम महसूल अधिकारी रजनी देशमुख यांनी सरपंच पार्वताबाई खंबाईतकर, पोलीस पाटील व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन जेसीबीच्या साहाय्याने हा रस्ता खुला केला. या कारवाईमुळे या भागातील ६० ते ७० नागरिकांच्या येण्या-जाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
२. मौजा करतवाडी: २२५ लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसूकरतवाडी ते अशोक सपकाळ यांच्या शेतापर्यंतचा अंदाजे १ कि.मी. लांबीचा रस्ता प्रशासकीय तत्परतेमुळे मोकळा झाला. या मोहिमेत भूमी अभिलेख कार्यालयाचे खेडकर साहेब व ग्राम महसूल अधिकारी रजनी देशमुख यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या रस्त्यामुळे तब्बल २२५ हून अधिक नागरिकांना थेट लाभ झाला असून, शेती कामासाठी मोठी सोय झाली आहे.
३. बाभूळगाव-सावरखेड: २.५ कि.मी.चा शिवरस्ता खुलासर्वात महत्त्वाची कारवाई मौजे बाभूळगाव, सावरखेड व बुद्रुक येथील २.५० कि.मी. लांबीच्या शिवरस्त्यावर करण्यात आली. भूमी अभिलेख विभागामार्फत अचूक मोजमाप करून आणि ग्राम महसूल अधिकारी अर्चना बाहेकर, रजनी देशमुख, मोरे साहेब व स्थानिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व अडचणी जागेवरच निकाली काढण्यात आल्या. यामुळे १०० ते १२० नागरिकांचा प्रवासाचा त्रास कायमचा दूर झाला आहे.
प्रशासकीय कार्यक्षमतेचे कौतुक”शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडवण्याला आमचे प्राधान्य आहे. सर्वांच्या सहकार्याने एकाच दिवशी हे तीन रस्ते मोकळे करता आले, याचे समाधान आहे.” विजय सवडे, तहसीलदार,
चिखली.या सलग आणि परिणामकारक कारवाईमुळे तालुक्यातील ग्रामीण दळणवळणाला नवी गती मिळाली आहे. प्रशासनाने दाखवलेल्या या गतिमान कामाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
