आता बळीराजाची वाट झाली सुकर; ३ कि.मी. लांबीचा खडक डोह रस्ता वाहतुकीसाठी सज्ज.

0
Screenshot_2026-05-06-19-05-31-11_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

चिखली (एकनाथ माळेकर)तालुक्यातील भरोसा येथील ‘खडक डोह’ म्हणून ओळखला जाणारा शेतरस्ता गेल्या १० वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र, महसूल प्रशासनाने दाखवलेला संयम आणि दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांमध्ये घडवून आणलेला संवाद यामुळे अखेर ५ मे रोजी हा १२ फुटी रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेती कामांमधील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे.भरोसा येथील गट क्रमांक ३३३ ते २३९ दरम्यानचा हा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. चिखली तहसील प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नायब तहसीलदार एच. डी. वीर यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अंढेरा पोलीस स्टेशनच्या बंदोबस्तात, कोणताही वाद न होऊ देता अत्यंत शांततेत हा ३ किलोमीटरचा मार्ग मोकळा करण्यात आला.या शेतरस्त्यासाठी संदीप पाटील, गणेश घुबे, अमोल थुटटे, संदीप बाबुराव थुटटे, विशाल थुटटे, सागर कवळे, देवेंद्र चेके, अभिमन्यू थुटटे, विशाल कव्हळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शेतीमाल बाजारात नेण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. अखेर या मागणीला यश आले असून प्रशासकीय पथकाने जागेवरच जेसीबीच्या सहाय्याने मार्ग तयार केला.या मोहिमेवेळी नायब तहसीलदार एच. डी. वीर यांच्यासह भूमी अभिलेख कार्यालयाचे आर. टी. आंधळे, पाटील साहेब, तलाठी व्ही. जे. मगर, पोलीस अधिकारी के. डी. जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय मुळे, सरपंच मल्लू हाटकर यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतरस्ता हा शेतकऱ्याचा कणा मानला जातो. खते, औषधे शेतात नेण्यापासून ते पीक बाजारात नेईपर्यंत रस्त्याची नितांत गरज असते. “रस्ता खुला झाल्यामुळे आता आमचा वाहतूक खर्च वाचणार असून, पावसाळ्यात होणारी चिखलाची ओढाताण थांबेल,” अशी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!