संशयाने घेतला बळी! बापाने मुलाच्या मदतीने पोटच्या मुलीला संपवले; राजुरा शिवारातील हत्येचा पर्दाफाश

0
IMG-20260510-WA0012

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ): जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजुरा शिवारात आढळून आलेल्या महिलेच्या छिन्नविछिन्न मृतदेहाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव जामोद पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनैतिक संबंधाच्या संशयावरून पोटच्या वडिलांनीच मुलाच्या मदतीने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, आरोपी बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी राजुरा शिवारातील आसिफ हमीद मुल्लाजी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली एका महिलेचे मुंडके नसलेले आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतील धड आढळून आले होते. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी तिचे डोके धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. सलग १२ दिवस पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांमार्फत तपास सुरू ठेवला. हा भाग मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असल्याने पोलिसांनी शेजारील राज्यातील बेपत्ता महिलांची माहिती घेतली.यादरम्यान खकनार पोलीस स्टेशन (जि. बुरहानपूर, म.प्र.) येथे एका महिलेची ‘मिसिंग’ तक्रार नोंद असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी संशयावरून बापुराम नथ्थु कलमेकर (५५ वर्षे) आणि अजय बापुराम कलमेकर (२७ वर्षे) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.मृतक महिला शिवानी बापुराम कलमेकर (विवाहानंतरचे नाव: शिवानी प्रकाश भिलावेकर) ही जळगाव जामोद तालुक्यातील असून तिचा विवाह अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे झाला होता. ती २० एप्रिल रोजी माहेरी आली होती. शिवानीचे तिच्याच चुलत भावाशी प्रेमसंबंध असल्याचे तिच्या वडिलांना कळले होते. यावरून घरात वाद झाला आणि २३ एप्रिलच्या रात्री वडील बापुराम यांनी शिवानीच्या डोक्यात बांबू मारून तिची हत्या केली.पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह टाकला महाराष्ट्रातहत्या केल्यानंतर आरोपींनी एक दिवस मृतदेह घरातच लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी वडिलांनी मुलगा अजयच्या मदतीने मृतदेह दुचाकीवर टाकून महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवरील राजुरा शिवारात आणला. तिची ओळख पटू नये म्हणून त्यांनी तिचे मुंडके कापून वेगळे टाकले आणि शरीराला आग लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.यांनी केली यशस्वी कारवाईपोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. श्रेणीक लोढा,श्री. अमोल गायकवाड, आणि एसडीपीओ श्री. आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनील अंबुलकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात सपोनि यशोदा कणसे, पोउपनि पंकज सपकाळे व इतर अंमलदारांचा समावेश होता.आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!