धाड पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्याला केले तडीपार; २ महिन्यांसाठी जिल्हयातून हद्दपार….
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ):बुलढाणा जिल्हयातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांनुसार, धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका सराईत अवैध दारू विक्रेत्यावर हद्दपारीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. जामठी येथील रहिवासी अफसर बलदार बरडे (वय ३८ वर्षे) याला ११ मे २०२६ रोजीच्या आदेशान्वये दोन महिन्यांकरिता बुलढाणा जिल्हयातून तडीपार करण्यात आले आहे.संबंधित इसम अफसर बरडे हा धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रित्या दारू विक्रीचा व्यवसाय करत होता. त्याच्या या कृत्यामुळे परिसरातील तरुण पिढी आणि जनसामान्यांवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन, त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ (१)(अ)(ब) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, बुलढाणा यांच्या कार्यालयात दाखल करण्यात आला होता.उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी अफसर बरडे याला आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र, त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे आणि प्रतिबंधक कारवाईचा विचार करून त्याला जिल्हयातून हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर भविष्यातही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा धाड पोलीस प्रशासनाने दिला आहे.सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. यामध्ये धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. प्रताप दत्तात्रय भोस, श्री. परमेश्वर केंद्रे, सफौ प्रभाकर लोखंडे, पोहवा श्रीकृष्ण चव्हाण, पोशि नितीन इंगळे, इब्राहीम पठाण, भास्कर जाधव आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
