वन्यप्राण्यांच्या शिकारीस पायबंद; बुलढाणा वनविभागाची अमडापूर येथे धडक कारवाई…
चिखली (एकनाथ माळेकर):बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मौजे अमडापूर परिसरात वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीला वनविभागाने जेरबंद केले आहे. रानडुकराची शिकार करून त्याचे मांस बाळगल्याप्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांना चिखली न्यायालयाने १७ जून २०२६ पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, १४ जून २०२६ रोजी अमडापूर बीटचे वनरक्षक गवारगुरू यांना शिकारीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीची दखल घेत उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक वैभव काकडे, वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे आणि फिरते पथकाचे वनपरीक्षेत्र अधिकारी किशोर पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने अमडापूर बीटमधील कंपार्टमेंट ६०७ मध्ये सापळा रचला.सायंकाळच्या सुमारास धोतरा नाईक-किनी नाईक पांदण रस्त्यावरून येणाऱ्या संशयितांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे वायरच्या थैलीत रानडुकराचे मांस आढळून आले. वनविभागाच्या पथकाने तातडीने कारवाई करत पाचही जणांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. रघुनाथ जगदेव तुमराम (वय ३७, रा. धोतरा नाईक)
२. नारायण राघू इंगळे (वय ६६, रा. वडाळी)
३. दगडू पांडुरंग ढंगारी (रा. वडाळी)
४. रामेश्वर वामन शिंदे (रा. हिवरा नाईक)
५. केशव भास्कर चौरे (रा. हिवरा नाईक)या कारवाईत शिकारीसाठी वापरण्यात आलेले धारदार शस्त्र, फास आणि जाळे वनविभागाने जप्त केले आहेत. आरोपींना १५ जून रोजी चिखली न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची वनकोठडी सुनावली.सदर कारवाईत उदयनगर वर्तुळ अधिकारी आर. बी. नेवरे, वनपाल बकाल साहेब, कर्मचारी एम. डी. गवळी, बी. के. पवार, नितेश गवई, गजानन शिंदे, समाधान शिंदे, आकाश शिंदे, कपिल मोरे, एस. एस. गायके आणि दत्ता कुदर यांनी मोलाची कामगिरी बजावली. तसेच, रोजंदारीवरील सुरेश व राम लोडे यांनी सहकार्य केले. पुढील तपास वर्तुळ अधिकारी आर. बी. नेवरे करत आहेत.
