उगला येथे विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान; गटविकास अधिकारी अंकुशराव म्हस्के यांचा दौरा

IMG-20250712-WA0003

सिंदखेडराजा (अनिल दराडे)सिंदखेडराजा तालुक्यातील उगला या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक ९ जुलै २०२५ रोजी एक आनंददायी आणि गौरवशाली क्षण पाहायला मिळाला. मा. अंकुशराव म्हस्के, गटविकास अधिकारी पंचायत समिती सिंदखेडराजा यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कला, प्रगती आणि शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक केले.

या दौऱ्यात इयत्ता १लीमध्ये शिक्षण घेणाऱ्या आराध्या या विद्यार्थिनीने एक सुंदर गीत सादर करून मा. गटविकास अधिकाऱ्यांचे मन जिंकले. तिच्या सादरीकरणाने प्रभावित होऊन त्यांनी तिला आणि तिच्या पालकांना यथोचित सन्मानित केले.शाळेतील शिक्षक श्री. बाबासाहेब विघ्ने व व्यवहारे मॅडम यांच्या अध्यापनातील समर्पणाची दखल घेत त्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून कॅरम बोर्ड भेट देण्यात आले.

या विशेष प्रसंगी मा. स्वप्निल निकम (गटशिक्षणाधिकारी), श्री. दराडे (विस्तार अधिकारी) तसेच गावचे सरपंच श्री. उगले यांची उपस्थिती लाभली होती.

विद्यार्थ्यांनी इंग्रजी rhymes सादर करून उपस्थितांचे मन मोहवले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले प्रयत्न पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून, संपूर्ण शाळा परिवाराने गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि उपस्थित अधिकाऱ्यांचे आभार मानले.

You may have missed

error: Content is protected !!