प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

IMG-20250717-WA0005

सिंदखेडराजा (अनिल दराडे)संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे दिनांक १३ जुलै २०२५ रोजी करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक सिताराम काटे व त्याचे सहकारी असल्याचा आरोप करत, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सिंदखेडराजा येथून करण्यात आलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

गायकवाड हे अक्कलकोट येथे एका पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्यावर आधी शाईफेक, धक्काबुक्की आणि नंतर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे राज्यभरात बहुजन समाजात तीव्र संतापाचे वातावरण आहे.

संभाजी ब्रिगेड ही गेल्या २८ वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन सामाजिक समतेसाठी कार्य करणारी संविधाननिष्ठ संघटना आहे. त्यामुळे अशा संघटनेच्या नेतृत्वावर झालेला हल्ला हा केवळ गुन्हा नसून सामाजिक न्याय व लोकशाही मूल्यांवर झालेला आघात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात हेही नमूद करण्यात आले आहे की, दीपक काटे याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत व त्याच्याकडून विमानतळावर रिवॉल्वरसह जिवंत काडतुसे सापडल्याची माहिती आहे. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला राजकीय पाठबळ मिळत असल्यास ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर, खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:

1. दीपक काटे व त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

2. या घटनेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.

3. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राजकीय अभय देणे थांबवावे.

 

निवेदनाच्या शेवटी इशारा देण्यात आला आहे की, जर दोषींवर तात्काळ कारवाई झाली नाही, तर संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, समता परिषद आणि शिवशाही विचारसरणीच्या संघटना संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडतील.

 

You may have missed

error: Content is protected !!