ग्राहकाचा अपमान, बँक व्यवस्थापकावर कारवाईची मागणी…
सिंदखेडराजा (अनिल दराडे)चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या देऊळगाव माही शाखेतील व्यवस्थापकाकडून ग्राहकाचा झालेला अपमान आता चांगलाच गाजू लागला आहे. अंढेरा येथील रहिवासी व बँकेचे नियमित खातेदार श्री. सुखदेव दत्तात्रेय सानप यांनी याबाबत थेट जिल्हा उपनिबंधक बुलडाणा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित व्यवस्थापकावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
श्री. सानप यांच्याकडे सेव्हिंग, करंट आणि कॅश क्रेडीट खाती असून त्यांचा बँकेशी दैनंदिन व्यवहार आहे. दि. १६ जुलै २०२५ रोजी त्यांनी आपल्या कॅश क्रेडीट खात्यात काही पैसे जमा करण्यासाठी बँकेत भेट दिली. मात्र, त्यांनी जमा करण्यासाठी आणलेल्या ₹१० च्या नोटा स्वीकारण्यास व्यवस्थापकाने सरळ नकार दिला. त्यानंतर श्री. सानप यांनी लेखी स्वरूपात याबाबत विचारणा केली असता, व्यवस्थापकाने “आम्ही दोन वर्षांपासून ₹१० च्या नोटा घेत नाही, तुला जे करायचं ते कर, कुणाकडे जायचं तिथे जा. बँकेतून निघून जा” असे अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप आहे.
हा संपूर्ण प्रकार बँकेत उपस्थित ग्राहकांपुढे घडल्यामुळे श्री. सानप यांची सामाजिक प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान दुखावल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
“जर अशा प्रकारे इतर खातेदारांसोबतही वागणूक दिली जात असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे सांगत त्यांनी जिल्हा उपनिबंधकांसोबतच चिखली अर्बन बँकेच्या मुख्यालय, तालुका उपनिबंधक, सहकार मंत्री व पत्रकार बांधवांकडे प्रत पाठवून सखोल चौकशी व कडक कारवाईची मागणी केली आहे.
—
या घटनेवरून काही महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात:
बँक व्यवस्थापकांनी ग्राहकांशी असे उद्धट वागणे कितपत योग्य?
₹१० च्या नोटा स्वीकारण्यास सरळ नकार देणे कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरले जाऊ शकते का?
सहकारी बँकांवरील ग्राहकांचा विश्वास टिकून राहील का?
प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आता सामान्य ग्राहकांकडूनही केली जात आहे. बँक ही सेवा देणारी संस्था असून, तिथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा आदर राखला गेला पाहिजे, ही जनतेची रास्त अपेक्षा आहे.
