शेतकरी संकटात, सरकार रम्यात मग्न शेतकरी विकास मंचचा तीव्र निषेध
अकोला (एकनाथ माळेकर)20 जुलै 2025 राज्यभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीचा अभाव, बोगस बियाणे, खतांचा तुटवडा आणि शेतमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तरीही कृषीमंत्री माणिकराव यांनी ओसाड गावच्या पाटीलकीचे स्वप्न पाहत, कृषीखात्याला ‘रमीचा डाव’ बनवले असल्याचा आरोप शेतकरी विकास मंचचे अध्यक्ष हुसेन खान यांनी केला आहे.
हुसेन खान यांनी सांगितले की,
“राज्य सरकारकडून रोज ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे दुर्लक्ष होत आहे. ना कर्जमाफी, ना हमीभाव, ना बोगस बियाण्यांवर कारवाई तरीही कृषीमंत्री रम्यात गुंतलेत, शेतकऱ्याच्या आयुष्याचा खेळ मांडला जातोय.”
ते पुढे म्हणाले की, राज्यात खरीप पेरणीसाठी शेतकरी झगडत आहे, पावसाची लपंडाव सुरू आहे, पण सरकारकडे ना नियोजन आहे ना संवेदनशीलता. खतांच्या टंचाईने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.
शेतकरी विकास मंचने कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे।
